पिंपळे सौदागरमध्ये झाड कोसळून नागरिक जखमी; प्रशासनाच्या तत्परतेने बचावकार्य…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.०४.०७.२०२६
पिंपरी- राहटणी–पिंपळे सौदागर* परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील सौदागर हॉटेलसमोर मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून श्री. एस. एन. गुडळे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
प्रशासनाच्या समन्वयातून जखमींना सुरक्षित बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या मणक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या बचावकार्यात पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व संबंधित यंत्रणांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या झाडांपासून, जीर्ण भिंतींपासून व धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



















