मोशी कचरा डेपोलगत इमारत कोसळली; १४ ते १५ जण अडकल्याची भीती
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, उद्धव कुंभार
दि.१०.०७.२०२६
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातील कचरा डेपोलगत असलेली एक इमारत बुधवारी दुपारी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे २४ ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे कचरा डेपोतील मोठा कचऱ्याचा ढिगारा घसरून इमारतीवर आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत किती जण जखमी झाले किंवा जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.



















