अयोध्या श्रीराम संस्थानातील सर्व पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांकडे मागणी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि. ११.०७.२०२६
अकोला – मंदिराच्या देणगी व संपत्तीच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी; दोषींना कठोर शिक्षा देण्याचे पत्र….
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार सुबोध सावजी यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून अयोध्येतील श्रीराम संस्थानाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीराम मंदिराच्या देणगी व संपत्तीशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर चंपत राय यांच्यासह आजपर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. .. ७ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात सावजी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या संपत्ती व देणगीवर दरोडा टाकल्याच्या आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणामुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या असून, श्रीरामाच्या नावाशी तसेच देशाच्या प्रतिष्ठेशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून चंपत राय यांच्यासह आजपर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. याशिवाय, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही सावजी यांनी केली आहे. राज्यपालांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे. या पत्रामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, अयोध्या श्रीराम संस्थानाच्या कारभाराबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….



















