माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे महार- मातंग समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब झोंबाडे यांची आयोजकांवर कारवाईची मागणी!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, देवाम्मा ददली
दि.१२.०७.२०२६
चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथील ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित “आरक्षण उपवर्गीकरण न्याय समर्थन परिषद” या कार्यक्रमादरम्यान माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी “आंबेडकरवादी चळवळ वळवळ” तसेच महार आणि मांग समाजाबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या कथित वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब झोंबाडे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसिद्धी माध्यमास दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशी वक्तव्ये लोकप्रतिनिधींनी किंवा सार्वजनिक व्यक्तींनी करणे अत्यंत निषेधार्ह आहे.
दादासाहेब झोंबाडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित वक्तव्याची चौकशी करण्याची तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांवर आणि दोषींवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच त्यांनी माजी आमदार सुधाकर भालेराव यांना भविष्यात कोणत्याही समाजाबाबत बेताल, आक्षेपार्ह किंवा द्वेष पसरविणारी वक्तव्ये न करण्याचे आवाहन केले आहे. "अशा प्रकारची वक्तव्ये पुन्हा झाल्यास संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशाराही त्यांनी दिला.
“महार आणि मातंग समाज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांनी प्रेरित असून, या दोन्ही समाजामध्ये बंधुता आणि ऐक्याची परंपरा आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा संघटनेने या समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी, अपमानास्पद अथवा विभाजनकारी वक्तव्ये करणे अत्यंत निषेधार्ह आहे. महार-मातंग समाजाची एकजूट अबाधित असून सामाजिक न्याय, संविधान आणि बंधुभावाच्या मूल्यांसाठी दोन्ही समाज खंबीरपणे एकत्र उभे आहेत,” असे मत झोंबाडे यांनी व्यक्त केले.



















