तेल्हारा तालुक्यातील वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; पात्र ११ कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, रवींद्र विरघट
दि.१३.०७.२०२६
तेल्हारा – राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील कलावंतांच्या निवड प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जिल्हा निवड समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ कलावंत शाहीर मुरलीधर देविदास लोनाग्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून पात्र कलावंतांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, सन २०२४–२५ या वर्षासाठी तेल्हारा तालुक्यातून २० कलावंतांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १५ कलावंत पात्र ठरले होते. शासनाच्या निर्देशानुसार काही नावे वगळल्यानंतर अंतिमतः ११ पात्र कलावंतांची यादी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, संबंधित ११ पात्र कलावंतांची अंतिम यादी पुढील कार्यवाहीसाठी वेळेत पाठविण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पात्र कलावंतांना न्याय मिळावा आणि निवड प्रक्रियेची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



















