एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.२६.०७.२०२६
पिंपरी- देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पावसाची रिमझिम सुरू असतानाही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, ज्योती मित्रमंडळाचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चिंचवड गावातील गांधी पेठेतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, आकुर्डी गावठाणातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, निगडी प्राधिकरणातील माणिकबाग उद्यानातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच यमुना नगर येथील मुक्ताई उद्यानातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच अभिषेक, काकड आरती आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली.
आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभिषेक, महाआरती, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच नामस्मरणाच्या कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी भाविकांना खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सेवा समिती ट्रस्टतर्फे यमुना नगर येथील मुक्ताई उद्यानातील मंदिरात सकाळी अभिषेक व आरती, दुपारी हरी ओम व सिद्धी विनायक महिला भजन मंडळाचा भजन कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ, श्याम देशपांडे यांचे संगीत भजन तसेच गंधार ग्रुपतर्फे ‘ *गजर *विठ्ठलाचा’* या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तिमय कार्यक्रमांना नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टच्या संस्थापिका सुलभा उबाळे, ज्येष्ठ नेते रामभाऊ उबाळे, अध्यक्ष अंकुश जगताप, सचिव अभिजित उबाळे, तुकाराम वाघ, संतोष सांदणकर, गणेश इंगवले, वासुदेव इंगळे, गजानन ढमाळे, अशोक लोखंडे, राजू जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
याशिवाय शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आकर्षक दिंडी काढून विठ्ठल नामाचा गजर केला. या दिंडीद्वारे सामाजिक ऐक्य, भारतीय संस्कृतीचे जतन आणि भक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त शहरभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



















