१५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; मोशीतील तरुण आळंदी पोलिसांच्या जाळ्यात
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, उद्धव कुंभार
दि. ४.०८.२०२६
पिंपरी – मोशी येथील एका तरुणाला तब्बल १५० कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणात आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. देशातील विविध राज्यांतील ६६ नागरिकांची ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन संजय काळे (वय २८, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे असून, तो या फसवणूक रॅकेटशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आळंदी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने तपासादरम्यान आरोपीच्या नावावर विविध बँकांमध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याचे उघड केले. तपासात आरोपीने स्वतःच्या नावावर नऊ बँक खाती उघडल्याचे समोर आले असून, त्या खात्यांमधून एटीएम व धनादेशाद्वारे मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
NCRP पोर्टलवरील माहितीनुसार, देशभरातील ६६ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीच्या तीन बँक खात्यांमध्ये सुमारे २ कोटी १८ लाख रुपये जमा झाल्याचे तपासात आढळले आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध तसेच आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, उपनिरीक्षक तुकाराम खडके, महिला पोलीस हवालदार आरती निकम, पोलीस शिपाई साळुंके व जगताप यांच्या पथकाने केली.
नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या नावावरील बँक खाते किंवा सिमकार्ड वापरण्यास देऊ नये. तसेच ऑनलाइन व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी. अनोळखी व्यक्तींकडून पैसे स्वीकारून ते एटीएम किंवा धनादेशाद्वारे काढून देणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



















