यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी; BVG संस्थेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
पिंपरी- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील PICU विभागात उपचार घेत असलेल्या दहा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच BVG संस्थेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी आणि संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रुग्णसेवक नयन रमेश पुजारी व मयूर चव्हाण यांनी केली आहे.
निवेदनातील माहितीनुसार, संबंधित बालिका श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील PICU विभागात दाखल करण्यात आली होती. उपचारादरम्यान बालिकेला शेक देण्यासाठी गरम पाण्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे बालिकेच्या शरीराला गंभीर भाजल्याचे तसेच पुढील उपचारादरम्यान प्रकृती अधिक गंभीर झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत रुग्णसेवकांकडून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच WhatsApp द्वारेही घटनेची माहिती देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद व योग्य ती कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता बालिकेचा मृत्यू झाला. या मृत्यूसाठी रुग्णालयातील संबंधित कर्मचारी तसेच BVG संस्थेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
रुग्णालयातील आया, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, कक्ष मदतनीस, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि प्रशिक्षण यांची तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी संबंधित संस्थेच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
रुग्णसेवकांच्या प्रमुख मागण्या
रुग्णसेवक नयन रमेश पुजारी व मयूर चव्हाण यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—
- बालिकेच्या मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी.
- चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
- BVG संस्थेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
- BVG संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
- BVG संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
- रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव व प्रशिक्षण यांची तपासणी करण्यात यावी.
- भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी रुग्णालयातील मनुष्यबळ व कामकाजाची प्रभावी तपासणी करण्यात यावी.
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णसेवक नयन रमेश पुजारी व मयूर चव्हाण यांनी केली आहे.



















