तेल्हारा तालुक्यातील रहस्यमय ड्रोनबाबत पोलिसांकडून नागरिकांना दिलासा, मॅपिंगच्या कामासाठी ड्रोनचा वापर होत असल्याची पोलिसांची माहिती; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. २३.०९.२०२६
तेल्हारा – तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रीच्या तसेच दिवसा ड्रोनसदृश उपकरणाच्या घिरट्या सुरू असल्याने काही दिवसांपासून नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर ड्रोनबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अकोला अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, अकोटचे उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. निखिल पाटील तसेच तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. संतोषजी इंगळे यांनी तेल्हारा तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या ड्रोनबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ड्रोन हे जीओ मोबाईल कंपनीशी संबंधित असून तालुक्यातील विविध गावांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ड्रोनच्या हालचालींबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
ड्रोन आकाशात दिसल्यानंतर त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि तर्कवितर्कांना सुरुवात होण्याची शक्यता असते. मात्र, अधिकृत माहिती समोर येईपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये किंवा सोशल मीडियावर अपुष्ट माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचवेळी, नागरिकांना एखाद्या ड्रोनच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास स्वतःहून त्याचा पाठलाग किंवा कोणतीही धोकादायक कृती न करता स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असेही आवाहन करणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, तालुक्यातील नागरिकांकडून ड्रोनच्या माध्यमातून नेमके कोणते मॅपिंग करण्यात येत आहे, त्याचा कालावधी आणि संबंधित कंपनीची अधिकृत कार्यवाही याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळाल्यास नागरिकांमधील संभ्रम आणखी दूर होण्यास मदत होणार आहे.



















