एम के एस कंपनी कडून रात्रीच्या वेळी मुरुमाची वाहतुक
गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाचे लक्ष कधी?
शिवसेनेचे अमोल ठाकरे यांचे तहसीलदारांना निवेदन…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२४.०९.२०२६
संग्रामपूर – तालुक्यातील संग्रामपूर–बोडखा तसेच नवीन भोन–वसाडी रस्त्यावर रात्रीच्या वेळी मुरूम, गिट्टी व इतर गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी धावणाऱ्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तात्काळ तपासणी करून DigiTP/Transit Pass, रॉयल्टी, वाहन क्षमता, खनिजाचे प्रमाण तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे अमोल ठाकरे यांनी तहसीलदारांकडे २३ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, रात्री ८ वाजेपासून पहाटे ४ वाजेपर्यंत मोठ्या हायवा वाहनांद्वारे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोठ्या क्षमतेची वाहने वेगाने धावत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री संग्रामपूर-बोडखा मार्गावर मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांचे निरीक्षण करण्यात आल्याचा दावा निवेदनकर्त्याने केला असून, त्यासंदर्भातील फोटो व GPS/लोकेशनसह पुरावे उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी MH-40 DC-8691 या वाहनाच्या रात्रीच्या वाहतुकीची विशेष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
DigiTP आहे की नाही? रॉयल्टी भरली आहे का?
रात्रीच्या वेळी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध DigiTP/Transit Pass आहे का, पासवरील वाहन क्रमांक, खनिजाचा प्रकार व प्रमाण, उगमस्थान आणि गंतव्यस्थान प्रत्यक्ष वाहतुकीशी जुळते का, तसेच संबंधित खनिजाची रॉयल्टी व शासकीय शुल्क भरले आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच रात्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी असल्यास संबंधित परवानगी आदेशाची प्रत तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परवानगी नसल्यास वाहनांवर तात्काळ कारवाईची मागणी
वैध वाहतूक पास अथवा आवश्यक परवानगी नसताना गौण खनिज वाहतूक आढळल्यास संबंधित वाहन व खनिजावर नियमानुसार कारवाई करावी. तसेच क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संबंधित विभागामार्फत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष पथक नेमून रात्रीची तपासणी मोहीम राबवा
संग्रामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, तसेच आवश्यक असल्यास अचानक तपासणी करून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.
तक्रारीसोबत फोटो, GPS/लोकेशन व संबंधित वाहनांची माहिती पुरावा म्हणून जोडण्यात आल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. या तक्रारीवर प्रशासनाने ठरावीक मुदतीत प्रत्यक्ष तपासणी करून कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अमोल ठाकरे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख , मोहन ठाकरे किसान सेना तालुका प्रमुख, सुनील मुकुंद, शिवाजी अढाव, जितेंद्र तायडे, सुदाम गोतमारे, विलास गोतमारे, राजेंद्र खारोडे आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.



















