फार्मर आयडी असूनही शेतकरी ‘लँडलेस’!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२९.०९.२०२६
🔷 कर्जमाफी, पीक कर्ज, पीक पेरा अन् पोकरा योजनेच्या लाभावर संकट;
🔷 संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांची बँक-तलाठी-तहसील कार्यालयात फरफट
संग्रामपूर- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आलेली Farmer ID आता संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. फार्मर आयडी असूनही Agristack प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या नावासमोर ‘LANDLESS’ असा उल्लेख दिसत असल्याने प्रत्यक्षात जमीन असूनही शेतकरी डिजिटल प्रणालीत भूमिहीन ठरत आहेत. शेतकऱ्याचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व शेतजमिनीची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली तयार करण्यात आली असली, तरी जमिनीचे क्षेत्रफळ Farmer ID सोबत लिंक न झाल्याने शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव असलेल्या काही शेतकऱ्यांनाही या तांत्रिक अडचणीचा फटका बसत आहे. सातबारा हातात असूनही तो Farmer ID सोबत लिंक नसल्याचे दिसत असल्याने नवीन पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत अडथळे निर्माण होत आहेत. Agristack मध्ये ‘LANDLESS’ असा स्टेटस दिसल्यानंतर शेतकऱ्यांना CSC केंद्र, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रणालीमध्ये शेतकऱ्याचे नाव दिसत असले तरी शेतीचे क्षेत्रफळ ऑनलाइन नोंदविले जात नसल्याने प्रश्न कायम आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही नवीन पीक कर्ज मिळवताना शेतकऱ्यांची फरफट होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यासोबतच सध्या सुरू असलेल्या पीक पेरा नोंदणी प्रक्रियेतही अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकरी पीक पेरा भरण्यासाठी शेतात गेल्यानंतर DSC MH ॲपवर लॉगिन होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेतून स्प्रिंकलर संच व कृषी अवजारे घेतलेल्या लाभार्थ्यांनाही Farmer ID मध्ये क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध नसल्याने अडचणी येत असल्याचे समोर येत आहे. डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रिया सोपी होण्याऐवजी शेतकऱ्यांना कार्यालयीन हेलपाटे मारावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतकरी प्रतिक्रिया..कोट
‘कर्जमाफीच्या पहिल्या यादीत माझे नाव आले. प्रमाणित प्रक्रिया पूर्ण करून बँकेत फाईल दिली; मात्र सातबाऱ्यासोबत Farmer ID लिंक नसल्यामुळे पीक कर्ज मिळण्यात अडचण येत आहे. मी 21 एप्रिल 2026 रोजी तहसीलदारांकडे Farmer ID संदर्भात अर्ज दिला, मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. पीक पेरा भरण्यासाठी शेतात गेलो असता ॲपवर लॉगिन होत नाही. पोकरा योजनेतून स्प्रिंकलर संच घेतला आहे; मात्र शेती Farmer ID सोबत लिंक नसल्याने अनुदानही मिळत नाही,’ अशी व्यथा एकनाथ रामचंद्र दूतोंडे, शेतकरी, आवार यांनी व्यक्त केली.



















