दुष्काळात डॉक्टर दाम्पत्याचा माणुसकीचा हात..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. २.१०.२०२६
🔷खाजगी डॉक्टर दाम्पत्याकडून “दुष्काळग्रस्त आरोग्य सवलत योजना
🔷दुष्काळात उत्पन्न आटले… पण माणुसकीचा झरा मात्र वाहता ठेवला!
🔷शेतकरी व शेतमजूरांना मिळतोय आरोग्य सेवेतून लाभ
संग्रामपूर- राज्यात अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत… अशा परिस्थितीत आजारपणाचा खर्चही अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतंय…मात्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याने अशा दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतलाय…
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना सवलतीच्या दरात उपचार देण्याची “दुष्काळग्रस्त आरोग्य सवलत योजना” च डॉ. योगेश आणि डॉ.वर्षा सपकाळ यांनी आपल्या खाजगी रुग्णालयात सुरू केली आहे.
दुष्काळाची झळ… हातातोंडाचा घास पडण्याची चिंता… आणि त्यात आजारपण आलं तर उपचारांचा खर्च करायचा तरी कसा?
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकरी आणि शेतमजूर अशाच आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
हीच परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. योगेश सपकाळ आणि डॉ. वर्षा सपकाळ या डॉक्टर दाम्पत्याने आपल्या रुग्णालयात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांसाठी सवलतीच्या दरात उपचार योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना नियमित उपचारांच्या तुलनेत कमी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक उपचारांमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय.
दुष्काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला असताना, आजारपणाचा अतिरिक्त आर्थिक भार कमी व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.कदाचित एखाद्या खाजगी डॉक्टरांनी सुरु केलेला असा हा पहिलाच उपक्रम असेल….
प्रतिक्रिया –
दुष्काळ हा केवळ शेतीचा प्रश्न नसतो… त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवरही होतो.
अशा काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी करून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न संग्रामपूरमधील या डॉ. सपकाळ दाम्पत्याने केलाय.दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना या योजनेचा फायदा ही होत आहे आणि शेतकरी, शेत मजूर यांना ही या परिस्थितीत समाधान मिळत आहे.
दुष्काळाच्या संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना आरोग्यसेवेतून दिलासा देण्याचा हा प्रयत्न… संग्रामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या या उपक्रमाची सध्या परिसरात चर्चा होतं आहे.



















