शाळांसाठी महापौर मैदानात! घणसोली, कोपरखैरणे व वाशीतील महापालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. १७.१०.२६
नवी मुंबई-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे, शाळांमधील शैक्षणिक वातावरण समृद्ध करणे आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याच्या उद्देशाने महापौर सुजाता पाटील यांनी शाळांच्या पाहणीचा धडक दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यांतर्गत त्यांनी घणसोली, कोपरखैरणे आणि वाशी परिसरातील विविध महापालिका शाळांना अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दरम्यान महापौरांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून शाळांमधील समस्या, इमारतींची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली.
रबाळे येथून पाहणी दौऱ्याचा प्रारंभ
महापौरांच्या या पाहणी दौऱ्याची सुरुवात रबाळे येथील कातकरीपाडा भागातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि महापालिका शाळा क्रमांक ५५ पासून झाली. त्यांनी शाळेच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली.
या प्रसंगी माजी महापौर तथा स्थानिक नगरसेवक सुधाकर सोनवणे विशेष रूपाने उपस्थित होते. महापौरांनी वर्गांमधील प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सोय, दैनंदिन कामकाजातील अडचणी आणि शैक्षणिक सुधारणांबाबत शिक्षकांशी सखोल चर्चा केली.
इतर शाळांची पाहणी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
रबाळेनंतर महापौरांनी कोपरखैरणे येथील महापालिका शाळा क्रमांक ७४ आणि वाशीगाव येथील महापालिका शाळा क्रमांक २७ ला भेट दिली. या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करून तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले व योग्य ते उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
कोपरखैरणे येथील पाहणीदरम्यान नगरसेवक शिवराम पाटील, नगरसेवक शिरीष पाटील आणि नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. या पाहणी दौऱ्यात समोर आलेल्या सर्व समस्यांवर लवकरच योग्य तो तोडगा काढला जाईल.”
— सुजाता पाटील (महापौर, नवी मुंबई)



















