पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२६.१२.१९
पिंपरी चिंचवड शहरात असणा-या अनधिकृत बांधकामधारकांवर शास्तीकराची टांगती तलवार आहे. भाजपाने लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणुकीत शास्तीकर माफीचे आश्वासन दिले होते. फसवे जीआर दाखवून शास्तीकर माफी जाहीर केली आणि भाजपाच्या आमदार, खासदारांनी जाहिरातबाजी करून साखर पेढे वाटून नागरिकांची फसवणूक केली. मागील अडीच वर्षातील त्यांच्या भ्रष्ट कारभाराने नागरिक त्रस्त आहेत. भविष्यात जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. महाविकास आघाडीकडून शास्तीकर माफी कृती समिती पूर्ण शास्तीकर माफीचा निर्णय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी केले.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नुकताच पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर धारकांचा मेळावा आकुर्डीतील खंडोबा मंदिर कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी सरपंच गणपत आहेर, अण्णा सोनवणे, प्रवीण शिंदे, यशवंत साने, ज्ञानेश्वर मुरकुटे, विशाल जाधव, संदेश नवले आदी उपस्थित होते. यावेळी साने म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत व वाढीव बांधकामांना महानगरपालिकेने मिळकतकरामध्ये बेकायदेशीरपणे शास्तीकर आकारला आहे. भाजपच्या निवडणुक जाहिरनाम्यात देखील शास्तीकरा माफीबाबत निर्णय घेऊ असे, आश्वासन देण्यात आले होते. मात्र, युती सरकारच्या कार्यकालात इच्छाशक्ती अभावी शास्तीकर माफीचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शास्तीकराबाबत निव्वळ राजकारणच केले जाते. भाजपच्या पदाधिका-यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल करून अनेकदा साखर, पेढे वाटून स्वत:ची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली. मात्र, शहरातील गोर, गरीब कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिला. या सर्व बाधितांना आता लोकनेते पवारसाहेब यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ असा निर्धार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी यावेळी केला. १९९७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या १८ गावातील मिळकतधारकांना १९९७ ते २००९ अशी तेरा वर्षांची मिळकतकर थकबाकी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून १०० टक्के मिळकतकर माफी मिळवून दिली होती. शास्तीकर माफी करण्याबाबत देखील पवार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कृती समितीचे अध्यक्ष दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळ पवार साहेबांना भेटणार आहे. यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक घेऊन पूर्ण शास्तीकर माफीचा निर्णय मार्गी लावू, असाही विश्वास माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी व्यक्त केला.



















