सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.१२.१९
फलटण- लोणंद रोडलगत नादुरूस्त उभ्या असलेल्या टेम्पोला मोटरसायकल वरून चाललेल्या दांपत्याने पाठीमागच्या बाजूला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद- फलटण मार्गावर तरडगावच्या हद्दीत फिर्यादी विशाल जाधव (रा. मुळीकवाडी, फलटण) हे आपल्या ताब्यातील टेम्पो नादुरूस्त झाल्याने रोडच्या साईडपट्टी लगत उभा केलेला असताना त्याच्या टेम्पोला वसंत दत्तात्रय सावंत (वय ५० रा. झणझणे सासवड ता फलटण) यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच ११ डी ४१६४ ने पाठीमागच्या बाजूला जोरदार धडकल्याने गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. तर मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सविता दत्तात्रय सावंत (वय ४३) जखमी झाल्या आहेत. या अपघाताचा पुढील तपास पो.ह. पाडवी करत आहेत.



















