बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
बीड- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड आज होत आहे. गतवेळी राज्यातील सत्तेच्या प्रभावाने जिल्हा परिषदेत संख्याबळ नसताना सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. यावेळी मात्र राष्ट्रवादीने भाजपला हबाडा दिला आहे. भाजपसोबत गतवेळी असलेली शिवसेना व इतर काही सदस्य राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. आता शिवकन्या शिरसाठ यांची अध्यक्षपदी तर बजरंग सोनवणे यांची उपाध्यक्षपदी निवड होण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
शनिवारी घेण्यात येत असलेल्या मतदानात आ. सुरेश धस गटाच्या चार तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाच्या एका सदस्यास मतदान करता येणार नाही. त्यामुळे भाजपचे संख्याबळ पाचने कमी झाले आहे. गतवेळी काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी भाजपला मदत केली, यावेळी त्यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या आशा दौंड या राष्ट्रवादी सोबत आहेत. शिवसंग्रामच्या चार सदस्यांपैकी एक ते दोन राष्ट्रवादी सोबत आहेत, यात अशोक लोढा यांचे नाव आहे. यासह गतवेळी भाजपसोबत असलेली शिवसेनाही आता राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे चार सदस्य असून, सेना नेते बदामराव पंडीत यांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. यामुळे गतवेळी भाजपच्या ताब्यात असलेली जिल्हापरिषद यावेळी राष्ट्रवादीने खेचून आणली आहे.
🔹महाविकास आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत- पंकजा मुंडे
राज्यातील महाविकास आघाडीचा परिणाम जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत झाल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ही निवडणूक लोकशाहिची प्रक्रिया म्हणून लढवित असल्याचेही त्या म्हणाल्या. तर, सत्ता फिरली की लोकांची मानसिकता बदलते, असे मत खा. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, निवडणूक आज होत असली तरी अधिकृत निकाल १३ रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर जाहीर करण्यात येणार आहे.



















