सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१३.०३.२०२०
महाबळेश्वर- भिमनगर ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत वनविभागाच्या भरारी पथकाला उत्तम यदुनाथ भालेराव याच्या घराची झडती घेतली असता त्याने कलिंदर या वन्यप्राण्याचे कच्चे मांस तुकडे करून जवळ बाळगळ्याचे आढळून आले.याप्रकरणी उत्तम यदुनाथ भालेराव याला वनविभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की वन विभागाच्या भरारी पथकाला कलिंदर या संरक्षित वन्यप्राण्याची शिकार झाल्याची माहिती मिळाल्याने भिमनगर ता.महाबळेश्वर येथील घराची झडती घेतली असता कलिंदर या संरक्षित वन्य प्राण्याचे कच्चे मांस उत्तम यदुनाथ भालेराव याच्या घरी सापडले.उत्तम भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष असल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.उत्तम भालेराववर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलिंदर हा प्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा प्राणी असल्याने शासनाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार या प्राण्यास अनुसूची २ मध्ये स्थान देऊन संरक्षित केले आहे.वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ३९ नुसार वन्यप्राणी हे राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे.अशा संरक्षित वन्यप्राण्यांचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने कठोर शिक्षेची तरतूद केली असून शिकार करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून देखील उत्तम भालेराव सारखे शिकारी अशा प्रकारे निरागस वन्यप्राण्यांना मारून निसर्गाचे पर्यायाने देशाचे अपरिमित नुकसान करीत आहेत. उत्तम भालेराव हा बहुजन वंचित आघाडीचा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष असल्यानेच त्याने शिकारीचे धाडस केले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. तर अशा शिकारींचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने कठोर शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी यांचेकडून केली जात आहे. या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन सातारा यांच्या वतीने सचिन डोंबळे, वनपाल गजानन भोसले,वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार, चालक दिनेश नेहरकर यांनी यशस्वी केली.या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















