चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१०.१२.१९
चंद्रपूर- जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या, तसेच चिमूर ,ब्रह्मपुरी , सिंदेवाही,नागभीड या तालुक्यांचे जिल्हा प्रशासनाला पासूनचे अंतर विचारात घेता चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या स्वाक्षरीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमुरला चिमूर, ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही या तालुक्यासह ६५२ गावांच्या कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे.
राज्य शासन आणि ११ सप्टेंबर १९ रोजी जाहीर केलेल्या अद्यादेशामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या सोबतच याठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, लघुलेखक ,अव्वल कारकून, व दोन लिपिक टंकलेखक यांची पदे देखील मंजूर केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्या पैकी चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड हे चार तालुके वगळता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उर्वरित ११ तालुक्यातील सर्व मंडळे आणि त्या अधिनस्त असलेल्या ११८४ गावांचा महसुली कारभार बघितला जाणार आहे. सोबतच चिमूर येथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चार तालुक्यातील सर्व मंडळे आणि त्या अधिनस्त असणाऱ्या ६५२ गावांचा कारभार बघितला जाणार आहे. राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देतांना या पदाला जिल्हाधिकारी यांच्या समकक्ष मर्यादीत अधिकारही बहाल केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १३ पोटकलम ३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्रदान करण्यात आलेल्या सर्व शक्ती अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना नेमून दिलेले कार्यक्षेत्र प्रदान करण्याबाबतचे अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
तथापि, अप्पर जिल्हाधिकारी चिमूर तालुका चिमूर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूरच असणार आहेत. तसेच त्यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त नागपूर हे काम बघणार आहेत.



















