आखाडी जोरात… पसरणी घाटात वाहतूक कोंडी… पर्यटक वेठीला…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.०७.०८.२०२६
सातारा – आषाढ महिन्यामध्ये सर्वत्र आखाडी यात्रेचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते आता ते घाटामध्ये देखिल बघायला मिळाल्याचे चित्र आहे. पुण्याहून महाबळेश्वर कडे जाताना रस्त्यात पसरणी घाट लागतो. सदरचा घाट हा अगदी अरुंद त्यामुळे धोकादायक म्हणून ओळखला जातो. याच घाटामध्ये अपघातांचे प्रमाण देखिल लक्षणीय आहे. आज शुक्रवार असल्याने महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच महाबळेश्वर वरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण देखिल तितकेच आहे. त्यातून या अरुंद घाटामध्ये असलेले बुवासाहेब मंदिरा जवळील वळण हे सुरतच्या बसचा झालेला भयानक अपघात व त्यातून तिसच्या वर प्रवाशांच्या मृत्यू साठी कुप्रसिद्ध. अशातच आज आखाडी यात्रेसाठी अनेक वाहनधारक आपल्या लहान, मोठ्या, अवजड वाहनांसह या परिसरात बेकायदेशीर पार्किंग करून उभे असल्याचे विचित्र चित्र दिसले. त्या बेशिस्त वाहन धारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस खात्याचे योगदान नगण्य असल्याने. पर्यटकांना, नागरिकांना तासंतास या मंदिराजवळ वाहतूक कोंडीमध्ये विनाकारण अडकून रहावे लागले. अजून गटारीसाठी काही दिवस बाकी असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यातून एखादा अपघात होऊ नये अशीच अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



















