उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०२.२०२०
कळंब- ज्या आगाराची बस आहे, त्या आगारप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक बसमध्ये ठळकपणे प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याचे आदेश एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहेत. त्यानुसार कळंब आगाराच्या सर्व बसमध्ये आगारप्रमुखांसह बसस्थानक व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्यात आले आहेत.
बसमध्ये एखादा चालक-वाहक प्रवाशासोबत सौजन्य दाखवीत नसेल किंवा प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन तातडीने व्हावे, या उद्देशाने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. कळंबच्या आगाराकडे ८६ बस आहेत. दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे. लांब पल्ल्याच्या बस किंवा ग्रामीण मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास प्रवासी थेट आगारप्रमुख, विभागीय नियंत्रक किंवा टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून समस्येबाबत गाऱ्हाणी मांडू शकतील.
बहुतांश वेळा प्रवासी आणि चालक-वाहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडतात. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने आणि एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मध्यंतरी हात दाखवा, गाडी थांबवा असे फलक जागोजागी लावले आहेत. शहरानजीक बससाठी थांबे निर्माण करण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी बस थांबविणे हे एसटीच्या कायद्यान्वये बंधनकारक आहे. शिवाय एक किंवा दोन प्रवासी असतील तर बस थांबविल्या जात नाहीत. बसमधील खिडक्या खिळखिळ्या झाल्या असून, प्रवाशांना खडखड-धडधड आवाजात आपला प्रवास सुखाचा करून घ्यावा लागत आहे. प्रवाशांना अडचण निर्माण झाल्यास, तक्रार करावयाची असल्यास, प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाच्या असल्यास कोणाकडे संपर्क करावा, ही अडचण येते. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने ज्या आगाराच्या बस आहेत, त्या आगारातील आगाराप्रमुखांचा मोबाईल क्रमांक, तसेच विभाग नियंत्रक व बसस्थानकाचा दूरध्वनी क्रमांक, टोल-फ्री क्रमांक प्रवाशांना ठळकपणे दिसेल असा लावण्याचे आदेश दिले आहेत.
🔹 एसटी महामंडळाच्या कळंब आगाराकडे ८६ बस आहेत. एसटी महामंडळाच्या आदेशानुसार कळंबचे आगारप्रमुख, नियंत्रक विभाग, आगार व बसस्थानकाचा दूरध्वनी क्रमांक असे फलक बसविण्यात आले आहेत.
- सुरेंद्र हौसलमल, आगारप्रमुख, कळंब



















