महाराष्ट्र दिन स्पेशल, जनतेच्या अडचणी….
महाबळेश्वर : दि.०१.०५.२०२१(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) सन २०१९ मध्ये हॉटेल मेघमधुर ते बीफ मार्केट असा पक्का रोड डांबर टाकून महाबळेश्वर नगर पालिकेने बनविला परंतु काहीच महिन्यात तो पुन्हा उखडून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. ती ड्रेनेज लाईन लहान असल्याने कुचकामी ठरली, म्हणून पुन्हा ती तोडून नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. चेंबर बांधण्यात आले.परंतु या मार्गावर पुन्हा डांबर टाकून रोड बनविण्यात आला नाही.वास्तविक रोड तोडण्यापूर्वी नगरपालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी जनतेला पुन्हा ताबडतोब डांबरीकरण करून रोड पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन संबंधितांनी पाळले नाही.आजतागायत गेल्या तीन वर्षांपासून अशाच खड्डेयुक्त रस्त्यावरून जनतेस दळण वळण करावे लागत असून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
अनेक वेळा नागरिकांनी या रस्त्याचे काम व्हावे म्हणून नगरपालिकेत विनंती अर्ज केले आहेत पण त्यास नगरपालिकेकडून ठरल्याप्रमाणे केराची टोपली दाखवली गेली आहे. संबंधित अधिकारी नागरिकांना भेटी देण्यास टाळा टाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना केली आहे. पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम करावे अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावर अनेकदा बाईकस्वाराना आपली गाडी घसरल्याने अपघाताचा सामना करावा लागत आहे. लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांना अडखळून पडल्यामुळे दुखापती झाल्या असल्याचे देखील नागरिक सांगत आहेत.
आज १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी तरी आम्हाला न्याय मिळेल का असा प्रश्न नागरिकांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.तर आधी ड्रेनेज लाईन नकरता, रस्ता करून, मग खोदकाम करून, रस्ता तोडून नगरपालिकेचे नुकसान करण्याचा निर्णय घेणारे अतिहुशार लोकप्रतिनिधी व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.



















