आरसी ट्रान्सफर’ ठप्प; आधारमधील नावाच्या विसंगतीमुळे नागरिकांना फटका
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि.३१.०६.२०२६
पिंपरी- वाहन खरेदी-विक्रीनंतर आरसी (Registration Certificate) हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्डवरील नाव आणि वाहन नोंदणीतील नाव यामध्ये विसंगती असल्यास ऑनलाइन आरसी ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिकांची कामे रखडत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना वारंवार आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. आधार आणि इतर शासकीय कागदपत्रांतील नाव, जन्मतारीख किंवा स्पेलिंगमध्ये तफावत असल्यास डिजिटल पडताळणी अयशस्वी होऊ शकते.
आरटीओशी संबंधित जाणकारांच्या मते, वाहन खरेदी-विक्री करण्यापूर्वी आधार, पॅन आणि इतर आवश्यक कागदपत्रांवरील नाव एकसारखे असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. नावात विसंगती असल्यास प्रथम संबंधित कागदपत्रात दुरुस्ती करून नंतरच आरसी ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



















