खामगाव तालुक्यातील वान नदीत बुडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि.२.०८.२०२६
संग्रामपूर- खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २० वर्षीय युवकाचा वान नदीतील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत युवकाचे नाव योगेश प्रकाश वानखडे (वय २०, रा. खुटपुरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा मित्रांसोबत अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिर व परिसर पाहण्यासाठी गेला होता. दर्शनानंतर मंदिरासमोरील वान नदीच्या पात्रातील डोहात मित्रांसह पोहत असताना तो पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाला.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस ठाणे तसेच अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अलीकडील पावसामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने शोधकार्याला अडचणी येत असून युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी पावसाळ्यात नदी, डोह व धरण परिसरात पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



















