खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणाऱ्यांवर कारवाई; राज्यभर विशेष मोहीम
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. ५.०८.२०२६
पुणे – महाराष्ट्रात खासगी वाहनांवर लाल रंगाची ‘पोलीस’ पाटी लावून तिचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील पोलीस यंत्रणेला परिपत्रक जारी केले आहे. काही व्यक्ती व लोकप्रतिनिधी खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावून तपासणी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे अशा पाट्यांचा वापर करून काहीजण बेकायदेशीर व्यवसाय, गुन्हेगारी तसेच इतर गैरप्रकारांसाठी वाहनांचा वापर करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांविरुद्ध राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २२२(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
अनधिकृतपणे ‘पोलीस’ किंवा इतर शासकीय ओळख दर्शविणाऱ्या पाट्या खासगी वाहनांवर लावू नयेत. नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे.



















