ज्येष्ठ कलावंतांचे बेमुदत उपोषण सुरू; तेल्हारा पंचायत समितीसमोर एल्गार
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क प्रतिनिधी, रविंद्र वीरघाटे
दि. ३.०८.२०२६
राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन
तेल्हारा – तालुक्यातील ज्येष्ठ कलावंतांनी विविध मागण्यांसाठी तेल्हारा पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या २०२४-२५ मधील लाभार्थी निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या निकषांनुसार अर्जदारांची निवड प्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यानंतर लाभार्थी यादीत बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
यापूर्वी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, मागण्यांची दखल न घेतल्याने उपोषण सुरू करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या उपोषणात अनेक ज्येष्ठ कलावंत सहभागी झाले असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



















