पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.१०.१९
शिरूर- दिवाळीसाठी गावी चाललेल्या दोन तरुणांवर शिरूरनजीक काळाने घाला घातला. पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव ता. शिरूर हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत आसाराम बाबासाहेब दराडे (वय २६) रा. पांगरी, ता. आष्टी, जि. बीड व महेश प्रकाश गिते (वय २१)रा. धाड बुद्रुक, ता. संगमनेर, जि. नगर हे दोघे ठार झाले. हा अपघात दि.२६ शनिवारपहाटे साडेतीनच्या सुमारास झाला.
आसाराम दराडे व महेश गिते हे पुण्यात कामाला असून, दीपावलीसाठी सुटी मिळाल्याने दिवाळी साजरी करण्यासाठी ते मोटारसायकलवरून एमएच १६ एजी९३२१ पुणे-नगर रस्त्याने मूळ गावी निघाले होते. कारेगावजवळील अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकला मागील बाजूने ठोकरल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर जखमा झाल्या.
त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकाशी संपर्क साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली तेव्हा दराडे याचा जागीच मृत्यू झाला होता. गिते याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेताना त्याचाही वाटेतच मृत्यू झाला.
नानासाहेब तबाजी पोटे रा. फलकेमळा, कारेगाव या रुग्णवाहिकेच्या चालकाने याबाबत कळविल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.



















