नवीमुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.८.०६.२०२३
तुर्भे- गुंजन गुप्ता ही महिला तुर्भे, सेक्टर २२ येथे आपल्या पती व मुलासोबत राहत होती. लग्नानंतर तिला पती व सासरच्या मंडळी मार्फत अधून-मधून मोठा त्रास सहन करावा लागत असे. काही महिन्यापूर्वी गुंजन गुप्ता ही घरच्यांच्या सल्ल्याने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी कामोठे येथे आली होती परंतु प्रसूतीननंतर बरेच महिने तिचा पती व सासरचे तिला घेऊन जाण्यास टाळा-टाळ करू लागले आणि सरतेशेवटी त्यांनी तिला घेऊन जाण्यास स्पष्ट नकारच दिला. यामुळे तिच्यावर मोठे संकटच कोसळले.
न्याय मिळेल या आशेने तीने कामोठे पोलीस स्टेशन व वाशी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु बेजबाबदार पोलीस प्रशासनाने तिला टोलवाटोलवीची उत्तर देऊन तिची तक्रार घेण्यास साफ नकार दर्शवले.
हताश झालेली तीन महिन्याच्या बाळाची माता न्यायाच्या आशेने इकडे तिकडे सैरावैरा भटकू लागली परंतु कोणीही मदतीस येईना. अखेरीस तिची रिपब्लिकन सेनेच्या नवी मुंबई महिला अध्यक्षा रेखाताई इंगळे यांच्याशी भेट झाली आणि तिच्या मनात एक आशेचे नवं किरण जागे झाले.
महिला अध्यक्षांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या सोबत गुंजन गुप्ता चे सासर गाठले. अन्यायग्रस्त महिलेच्या पती व सासरच्या मंडळींची आपल्या स्टाईलने चांगलीच खरडपट्टी काढत तसेच कायद्याचे डोस पाजत त्यांना चांगलेच वठणीवर आणले. अखेरीस पती व सासरच्या मंडळीना आपली चूक उमगली. त्यानंतर त्यांनी सर्वांची माफी मागत गुंजन गुप्ताला आपल्या पदरात घेतले.



















