खरंतर आईला हाक मारताना त्या हाकेत जो सात्विक भाव असतो तसचं काहीसं तुला हाक मारताना जाणवतं.. आणि ते जाणवायलाचं हवं कारण अगदी सुरुवातीपासूनचं नातं आहे आपलं. अगदी लहानपणापासूनचं ...
लहानपणी काही नाती अगदी सहजपणे जोडली जातात त्यातलंच हे आपलं नातं…
तेव्हा माझे दोन लाडके मामा होते
एक तो चंदामामा आणि दुसरा म्हणजे तो खोडकर उंदीरमामा…
तसचं दोन लाडक्या ताई सुद्धा होत्या.
एक तु (चिऊताई) आणि दुसरी ती खारुताई…
कालवलेला दुधभात भरवताना ‘एक घास काऊचा अन् एक घास चिऊचा’ असं आईने बोलल्यावरचं तो घास खाण्यासाठी तोंड उघडलं जायचं…
प्रत्येक वेळी झोपताना तुझी अन् कावळ्याची गोष्ट हट्टाने सांगितली जायची…
“एक होता कावळा, एक होती चिमणी, कावळ्याचं घर शेणाचं अन् चिमणीचं घर मेणाचं” इतकं ऐकलं की आम्ही झोपेच्या स्वाधीन व्हायचो…
त्या गोष्टीत तुझं घर मेणाचं होत म्हणे…
गोष्टीत का असेना पण किती काळजी आणि दूरदृष्टी ठेवून बांधल होतस तु ते घर… नाहीतर आमचं मायबाप सरकार निष्काळजीपणे कसला कमकुवत पादचारी पूल उभा करतं.
अन् आमच्या निष्पाप बांधवांचा हकनाक बळी जातो तिथे…
असो
तुला माहितीये?
माझ्या ताईला तु खुपच आवडली होतीस आणि म्हणूनच आईने तिच नाव “चिऊ” असं ठेवलं…
आजही आम्ही तिला चिऊचं म्हणतो…लहानपणी तिची आम्हाला
आमची चिऊ रुसली का? असं बोलून समजूत काढावी लागायची.
परवा गर्दीत शेजारच्या एका मुलीचे शब्द कानावर पडले… ती तिच्या सोबतच्या मैत्रिणीला म्हणाली
‘आमच्या चिऊ मावशीला दोन जुळ्या मुली झाल्या बरं का!’
खरंतर दोन कन्या रत्नांना जन्म दिला म्हणून तिच्या चिऊ मावशींच कौतुक वाटलंच पण अजूनही लहानपणीच नाव त्यांनी अगदी सहिष्णुतेने स्वीकारल्याचं पाहून मनाला फार बरं वाटलं…
त्याच वेळी मनात विचार आला की या मावशींच्या मुली मोठ्या झाल्यावर मावशींना जेव्हा विचारतील की
‘आई तुझं नाव चिऊ असं का आहे?’
तेव्हा ती चिऊ मावशी त्यांच्या मुलींना सांगतील की मला लहानपणी चिमणी खूप आवडायची म्हणून.
पण
त्या लहानग्यांना चिमणी पाहायची असेल तर तेव्हा चिऊ मावशी
त्यानां चिमणी दाखवू शकतील काय?
चिऊ ताई शिवाय आता बाळ खाऊ खाणार कसं?
चिऊ ताई शिवाय आता बाळ झोपणार कसं?
कुठे गेली चिऊ ताई?
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड…….
श्री. श्रीकांत रावसाहेब बागल