मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०३.२०२०
मुंबई- भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रूग्ण हा ३० जानेवारी रोजी केरळमधील थ्रिशूर येथे सापडला. महत्वाची बातमी म्हणजे चीनमधील वुहान येथून आलेल्या या पहिल्या रूग्णाला २० फेब्रुवारी रोजी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १ मार्चपर्यंत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या हा रूग्ण आता एकदम ठणठणीत झाला आहे. कोरोनाशी दोन हात केलेल्या या २० वर्षीय तरूणीने तिचा अनुभव व्यक्त केला आहे.
‘माझ्यामध्ये जेव्हा कोरोना व्हायरस आढळल्याचे स्पष्ट झाले तेव्हा मी घाबरले नाही. उलट मी खूप सतर्क झाले. पण माझे पालक थोडे घाबरले होते. मात्र या सगळ्यात मी मला सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी आवर्जून करत होते जे मला कोरोनाशी दोन हात करायला मदत करत होत्या, ही माहिती केरळातील थ्रिशूर इथे राहणाऱ्या २० वर्षीय मेडिकल विद्यार्थीनीने दिली आहे.’ चीनमधील वुहानहून परतल्यावर अगदी एका आठवड्यात या तरूणीला कोरोनाची लागण झाली.
मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी ही तरूणी २४ जानेवारी रोजी कोचीला पोहोचली. कोचीला पोहोचल्यावर तिला आरोग्य अधिकाऱ्यांकडून काही फॉर्म भरायला सांगितले. मेडिकल विद्यार्थी असल्यामुळे तिला दिलेल्या सर्व गाईडलाईन फॉलो केल्या आणि योग्य ती माहिती त्यांना पुरवल्याचं तरूणी सांगते.



















