पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०३.२०२०
पिंपरी- महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली असून भोसरीतील नगरसेवक संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्याने लोंढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी रुबल अगरवाल यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असून, भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक १० सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायीचे अध्यक्ष विलास मडीगेरी, माजी अध्यक्ष ममता गायकवाड, सागर अंघोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादीचे गिता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिनाअखेरिस पूर्ण झाला. त्यामुळे नविन ८ सदस्यांची निवड नुकतीच झाली. त्यात भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे या सहा जणांची तर राष्ट्रवादीचे पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा शिलवंत धर यांची वर्णी लागली आहे.
संतोष लोंढे म्हणाले, “शहरातील पाणीप्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावणे. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केले होते. स्थायीत अकरा सद्यस्यांसह भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे संतोष लोंढे यांची निवड निश्चित मानले जात होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. महापालिकेतील स्थायी समिती सभागृह निवडणूक प्रक्रिया पार पडली.



















