३०० रुपयांची पी.पी.ई. किट खासगी दवाखान्यात सहाशेला,
रुग्णांना लुटण्यासाठी इस्पितळांचे नाना प्रकार
नागपूर(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०५.२०२१
नागपूर- खासगी इस्पितळांकडून रुग्णांची लूट थांबवण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विविध नियमावली तयार केली असली तरी ती फक्त कागदोपत्रीच असून त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा खासगी इस्पितळांच्या दावणीला बांधली गेली आहे.
बाजारात तीनशे रुपयांना मिळणाऱ्या पी.पी.ई. किट्ससाठी रुग्णालये सहाशे रुपये आकारत आहे.
अनामत रक्कम जमा केल्याशिवाय रुग्णांना आत घेतले जात नाही, असा मनमानी कारभार सध्या सुरू आहे.
श्रीमंतांना याचा काहीच फरक पडत नाही, पण गरजू नागरिक, रुग्ण जीव वाचवण्यासाठी एखाद्या खासगी रुग्णालयात गेला तर त्याला या लुटीचाअनुभव येतो व तो बाहेर पडण्यासाठी धडपडतो, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
भा.ज.पा. नेते व माजी महापौर संदीप जोशी यांनी वाढीव देयकाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केल्याने खासगी रुग्णालयांच्या लुटीचे नाना प्रकार उघड होत आहे. अनामत रक्कम रुग्णांकडून घेऊ नये, असे शासनाचे आदेश असताना एकाही खासगी रुग्णालयात ही रक्कम घेतल्याशिवाय रुग्ण दाखल करून घेतला जात नाही. या पैशाची पावती दिली जात नाही.
पन्नास हजार ते एक लाख इतकी ही रक्कम असते.
याशिवाय इस्पितळ भाडे, रुग्णशय्येचे भाडे, व्हेंटिलेटरचे भाडे, प्राणवायूचे भाडे, नर्स आणि डॉक्टरांचे शुल्क या शिवाय पॅथॉलॉजी आणि औषधाचे पैसे वेगळे घेतले जातात. विशेष म्हणजे, हा सर्व खर्च सरकारी दरात उपचार करणाऱ्या रुग्णांकडून वेगळा घेतला जातो. रेमडेसिवीर, प्लाझ्मा रुग्णांनाच बाहेरून आणावा लागतो. रुग्ण हाताळणारी यंत्रणा पैशाचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा अशा दोन स्वतंत्र यंत्रणा खासगी दवाखान्यात कार्यरत आहेत. रोज सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांना पैशासाठी फोन केले जाते.



















