सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०२.२०२०
सातारा- तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. पुनर्वसनाचे रखडलेले काम करण्यासाठी ५० हजारांची ऑनलाइन लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव रमाकांत फडतरे असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एकाचे जमीन पुनर्वसनाचे काम सातारा तहसील कार्यालयात प्रलंबित होते. ते काम करण्यासाठी लिपिक फडतरे याने ५० हजाराची लाच मागितल्याची सातारा एसीबीला तक्रारदाराने माहिती दिली होती. त्यानंतर एसीबीने तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी सायंकाळी सापळा लावून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी फडतरे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर फडतरे याने लाचेची रक्कम त्याच्या बॅंक खात्यात भरण्यास तक्रारदाराला सांगितले.
त्यानुसार तक्रारदाराने फडतरेच्या बॅंक खात्यात लाचेची रक्कम म्हणून ५० हजार रुपये भरल्यानंतर एसीबीने त्याला ताब्यात घेतले. फडतरे याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. एसीबी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, एसीबी अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्यासह सातारा एसीबीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.



















