भिगवण प्रकरणाला नाट्यमय कलाटणी: तरुणीने न्यायालयासमोर बदलला स्वतःचा जबाब, आरोपीचा काका अझर शेख अटकेत
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२८.०२.२६
पुणे- इंदापूर तालुक्यातील भिगवणला घडलेल्या २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून अझर शेख आणि त्याचा साथीदार युवराज मेंगावडे या दोघांना ताब्यात घेत गजाआड केले आहे.
अटक करण्यात आलेला अझर शेख दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. या प्रकरणातील मुख्य तरुण जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता (काका) लागतो. अझर शेख याच्यावर दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी स्वामी चिंचोली गावातील महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा मोठा आरोप त्याच्यावर आहे आणि याच गुन्ह्यात तो गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला होता की, अझर शेख हा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा, निष्ठावान कार्यकर्ता आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाकडून अझर शेख याला अटक करण्याची जोरदार मागणी केली जात होती. अखेर पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्याच्यासह युवराज मेंगावडे याला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण आणि अझर शेखचा सहभाग?
भिगवणमधील ही २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असताना, अज्ञातांनी तिच्या आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकून तिचे बळजबरीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. १७ फेब्रुवारी रोजी ही तरुणी जहीर शेख या मुस्लिम समाजातील तरुणासोबत घरातून निघून गेली होती आणि त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी हे दोघेही बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले होते.
पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे तरुण-तरुणी पोलीस ठाण्यात हजर होण्याच्या काही तास आधीच अझर शेख याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘सदैव एकनिष्ठ’ असे एक स्टेटस ठेवले होते. यावरून या प्रेमी युगुलाला पळवून नेण्यात आणि त्यांना मदत करण्यात अझर शेख याचाच मोठा हात असल्याचा दावा केला जात आहे.
तरुणीने कोर्टात अचानक बदलला जबाब
सुरुवातीला या तरुणीने बारामती पोलीस आणि बारामती सत्र न्यायालयासमोर असा जबाब दिला होता की, तिचे जहीर शेख याच्यावर प्रेम असून ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेली आहे. तसेच, तिने एक प्रतिज्ञापत्र सादर करून आपल्या आई आणि भावाने दिलेली अपहरणाची फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचे न्यायालयात सांगितले होते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पुढील प्रक्रियेसाठी पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात (पुनर्वसन केंद्रात) केली होती.
पाच दिवस सुधारगृहात राहिल्यानंतर, आज इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने या तरुणीला काही प्रश्न विचारले आणि तिला कोणाकडे जायचे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. आधी तरुणासोबत राहण्यावर ठाम असलेल्या या मुलीनं आपला पूर्वीचा जबाब पूर्णपणे बदलला आणि आपल्याला आपली आई व मामा यांच्याकडे परत जाण्याची इच्छा असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. तरुणीच्या या बदललेल्या भूमिकेमुळे आता या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे.



















