बार्टीतील विभागप्रमुखांच्या प्रतिनियुक्तीला बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघाचा विरोध; प्रधानसचिवांना निवेदन
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, विकास ओव्हाळ
दि. २४.०७.२०२६
पुणे – बार्टीच्या योजना विभागातील विभागप्रमुख (योजना) पदावर स्नेहल भोसले यांची झालेली प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ, पुणे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांची बार्टी कॅम्पस, येरवडा येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेच्या निवेदनानुसार, स्नेहल भोसले यांनी यापूर्वी योजना विभागाच्या प्रमुखपदावर कार्यरत असताना विभागाच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचल्याचा तसेच फेलोशिपधारक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी करून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांनी संबंधित प्रतिनियुक्तीबाबत माहिती घेतली असून, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केल्याचे संघटनेने सांगितले.
संघटनेने इशारा दिला आहे की, मागणी मान्य न झाल्यास बार्टी संस्थेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी मुख्य समन्वयक सिद्धार्थ ओव्हाळ यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर समाजाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी आणि बार्टीसारख्या संस्थांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.



















