पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त मंगो पल्पवर एफडीएची कारवाई; २.२३ लाखांचा माल जप्त
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि.०३.०७.२०२६
पुणे- पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त मंगो पल्प तयार करून विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख २३ हजार रुपयांचा संशयित मंगो पल्प जप्त करण्यात आला.
एफडीएच्या पथकाने तपासणीदरम्यान संशयित मंगो पल्पचा साठा जप्त केला असून, संबंधित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू असून, नागरिकांनी कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्याची गुणवत्ता, उत्पादन तारीख व परवानाधारक उत्पादकाची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.



















