पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०१.२०२०
पुणे- नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शाैर्य गाथेवर आधारलेला ‘तान्हाजी’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. प्रजासत्ताकदिनी तब्बल ३० हजार पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली. सकाळी १० वाजताच गडावरील पार्किंग फुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
पुणेकर आणि देशभरातील पर्यटकांसाठी सिंहगड नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विकेंडला सिंहगडावर गर्दी हाेत असते. अनेकदा घाटात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी देखील हाेत असते. नुकताच अजय देवगण यांची प्रमुख भुमिका असलेला ‘तान्हाजी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सिंहगडची लढाई आणि तानाजी मालुसरे यांची शाैर्यगाथा दाखविण्यात आली आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगड पाहण्याचे तसेच ज्या ठिकाणावरुन तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावरुन चढाई केली हाेती ताे कडा पाहण्याची माेठी उत्सुकता पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आता सिंहगडावर वळत आहेत.



















