पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०१.२०२०
🔹सोलापूरच्या माऊली जमदाडेची धक्कादायक कूच
पुणे- महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माऊलीने महाराष्ट्र केसरीचा गतविजेता बाला रफिक शेख याला चितपट करुन माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे.
या लढतीत बाला रफिक शेख पहिल्या मिनिटाला २-० असा आघाडीवर होता. पण दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने हप्ते डावावर बाला रफिकला चितपट करत यंदाच्या स्पर्धेतला धक्कादायक निकाल नोंदवला. बालाला चितपट करणारा माऊली जमदाडे हा मूळचा सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.
दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात अजून एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. बाला रफिक पाठोपाठ गतउपविजेता आणि २०१८ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचंसुद्धा महाराष्ट्र केसरीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजीतला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढण्याच्या इराद्यानं मॅटवर उतरलेल्या अभिजीतला हर्षवर्धनं ५-२ अशा फरकानं हरवून सनसनाटी विजयाची नोंद केली आहे.
हर्षवर्धन सदगीर हा या स्पर्धेत नाशिककडून खेळतो पण तो अर्जुनवीर काका पवारांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संरकुलात सराव करतो. दरम्यान या दोन धक्कादायक निकालांमुळे यंदा महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नवा पैलवाना मानाची चांदीची गदा उंचावणार आहे.



















