पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०२.२०२२
शिरूर- शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या कसोशीने अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर संदीप परदेशी यांचे अपहरण करून मारहाण करून खंडणी मागण्यात आली होती. यानंतर सदरील डॉक्टरांना मारहाण करून सोडण्यात आले होते.या घटनेनंतर शिरूर शहरासह सर्वत्र खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य सूत्रधार कुणाल परदेशी यास अटक केली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.या पथकाने तपास करत असताना या गुन्ह्यातील आणखी आरोपी मयूर बोराने रा. वारजे माळवाडी हा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने मयूर यास सापळा रचून वारजे स्टँड येथे ताब्यात घेतले.तसेच आरोपी सिद उर्फ सिद्धेश घायतडक रा. ताडीवाला रोड,पुणे हा देखील ताडीवाला रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने बंडगार्डन पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार किरण तळेकर यांच्या मदतीने पोलिसांनी सिद्धेश यास ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपींनी हा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे पोलिसांना सांगितले. या गुन्ह्यातील कुणाल परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी २०२१ मध्येही रांजणगाव एमआयडीसी परिसरात भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून पाच लाखाची खंडणी उकळली असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. यातील आरोपी कुणाल परदेशी यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी सिद्धार्थ घायतडक यावरही बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी पुढील तपासासाठी शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार तुषार पंदारे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,राजू मोमीन,अजित भुजबळ,मंगेश थीगळे,योगेश नागरगोजे, मुकुंद कदम,किरण तळेकर यांनी केला आहे.



















