पुणे (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०५.०१.२०२०
मावळ- तळेगांव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ब सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या जनसेवा विकास समितीने भाजपाची साथ सोडली असून अपक्ष उमेदवारास पुरस्कृत केले आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्यात दुरंगी लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चार -पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. या प्रभागात फलकेवाडी, पवारचाळ, टेल्को कॉलनी, म्हाळसकरवाडी, पैसा फंड काच कारखाना, स्वराज नगरी, कोकाटे वस्ती, राजगुरव कॉलनीचा काही भाग यांचा समावेश आहे. या निवडणुकीत संगीता शेळके यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रभाग क्रमांक सातमधे एकूण ३ हजार ८९३ मतदार आहेत. यामध्ये २ हजार ९४ पुरुष तर १ हजार ७९९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपाने येथील जागा कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती तसेच जनसेवा विकास समितीने भाजपाच्या ताब्यातील जागा खेचून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. मतदान ९ जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी १० जानेवारी रोजी होणार आहे.



















